राहुल गांधींची खासदारकी बहाल केल्याने देशातील जनतेच्या आशा पल्लवीत 

मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष.

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच पण देशातील जनतेच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत. देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरु असून या तानाशाहीविरोधात इमानदारीने लढाणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole) यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी कायम केल्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मा. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतर सोमवारी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी बहाल केली. राहुल गांधी यांच्याविरोधात नियोजनबद्ध पद्धतीने षडयंत्र रचून खोट्या केसमध्ये अडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. कर्नाटकातील एका प्रचारसभेतील विधानावर सुरतच्या कोर्टात भाजपाचा स्थानिक नेता खोटी केस करतो व न्यायालय दोन वर्षांची शिक्षा ठोठावते, लगेच २४ तासाच्या आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली जाते व सरकारी निवासस्थानही सोडण्यास भाग पाडले जाते. हे सर्व राजकीय हेतूने करण्यात आले आहे. शेवटी मा. सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिली, हे समाधानकारक असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे स्वाभाविक आहे.

टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मोठा जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम, देवानंद पवार, प्रमोद मोरे, रमेश शेट्टी, राणी अग्रवाल महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रवक्ते भरत सिंह, भावना जैन, जोजो थॉमस, सचिव राजाराम देशमुख, श्रीरंग बर्गे, गजानन देसाई, बी. जी. शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.