देशातील ५४ टक्के ओबीसी समाज संघटीत राहिला तर ओबीसींच्या प्रश्नांना कोणीही टाळू शकणार नाही- छगन भुजबळ

विणकर समाजासाठी राज्य सरकार कडून लवकरच आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती - मंत्री छगन भुजबळ

पुणे :- विणकर समाजाच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार सकारात्मक असून विणकर समाजासाठी राज्य सरकारकडून लवकरच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ(Chaagan Bhujbal)  यांनी केले.

महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीच्या वतीने ‘ राष्ट्रीय विणकर दिनाचे’ औचित्य साधून पिंपळे गुरव येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी इचलकरंजी मनपा आयुक्त महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश दिवटे, सुनिल मेटे, अशोक मुसळे, हिरालाल पगडाल, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, कृती समितीचे संयोजक सुरेश तावरे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विणकरांच्या कलेची दखल घेऊन ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हॅन्डलूम डे म्हणुन घोषित केला. शेती खालोखाल प्रमुख व्यवसायात विणकर वस्त्रोद्योगाचा समावेश आहे. महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समिती ही विणकरांना त्यांचे न्याय हक्क मिळवुन द्यावे यासाठी प्रयत्न करत आहे. विणकर संघटीत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सगळे काम करत आहात. ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, विणकर समाजाचा व्यवसाय सध्या अनेक अडचणीतुन जात आहे कोविडच्या संकटा नंतर अनेक व्यवसायाला फटका बसला त्यात विणकर एक होते.
नुकत्याच झालेल्या राज्याचे पावसाळी अधिवेशनात राज्यातील प्रत्येक लहान लहान घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे.अनेक लहान लहान घटकांना न्याय मिळावा यासाठी आपण अनेक समाजासाठी महामंडळे स्थापन केली त्यात आपणसंत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै. मारुती चव्हाण- वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे. आणि त्याचबरोबर विणकर समाजासाठी देखील महामंडळ स्थापन करण्याची तयारी राज्य सरकारची तयारी सुरु आहे.त्यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, इतिहासात अनेक ठिकाणी नोंदी आहेत जिथे जिथे वस्रोद्योग वाढीला लागला तिथे तिथे औद्योगीक क्रांती देखील झाली.वस्रोद्योग हा माझा मतदारसंघ असलेल्या येवल्यात देखील मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या व्यवसायाशी माझा जवळचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तुम्ही तुमची ही एकीची शक्ती जर दाखवली तर निश्चितपणे तुमची दखल सर्वांनाच घ्यावी लागेल. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. या तिनही गोष्टी माझ्याकडे आहेत. अन्न नागरी पूरवठा मंत्री मी आहेच. वस्त्र निर्माता विणकर समाज आज माझ्या सोबत आहेत. आणि निवारा तर ओबीसी समाजासाठी १० लाख घरकुल बांधण्याचा निर्णय माझ्या सरकारने घेतला.
त्यामुळे या तिनही गरजा पुर्ण करण्याचे पुण्य मला लाभत असल्याचे त्यांनी सांगितले

ते म्हणाले की, राजकीय परिस्थीती बदलली आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत या सरकारच्या माध्यमातुन तुमच्यासाठी जे जे करणे गरजेचे असेल त्यासाठी आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ, विखुरलेला विणकर समाज आता हा एक झाला पाहिजे यामध्ये असलेल्या ३०-३२ जाती एकत्र झाल्या पाहिजे आणि तुम्ही ओबीसी म्हणुनच तुमच्या मागण्या मांडल्या पाहिजे. वस्रोद्योगासंदर्भित असलेल्या मागण्या मी निश्चितपणे मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येतील. तसेच या मागण्यांचा सकारात्मक विचार महायुती सरकार निश्चितपणे करेल असे त्यांनी आश्र्वस्त केले.

ते म्हणाले की, देशातील ५४ टक्के ओबीसी समाज संघटीत राहिला तर ओबीसींच्या प्रश्नांना कोणीही टाळू शकणार नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी एकसंघ राहण्याची आवश्यकता आहे. ओबीसी समाजातील प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा असून विणकर समाजाला जे काही सरकारी लाभ मिळतील ते ओबीसी म्हणून मिळणार आहे. समाज बांधवांनी ओबीसी या एका छताखाली संघटीत व्हावे. संघटीत झाल्यावरच आपले प्रश्न मार्गी लागतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, देशात जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसींची संख्या निश्र्चित होणार नाही आणि ओबीसींना न्याय मिळणार नाही. त्यामुळे जनगणना होण्यासाठी ओबीसींचा रेटा वाढला तरच सरकार सकारात्मक विचार करेल. देशात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा घेऊन आपण पुढे जात असून त्यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी म्हटले आहे की, ‘सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा’. त्यामुळे सत्ता असेल तर आपण आपले प्रश्न लवकर सोडवू शकतो. विणकर बांधवांचे जे काही प्रश्न असतील ते सर्व सरकारच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.