म्हापसा कॉंग्रेसला मोठा धक्का; तारक आरोलकर यांनी वाढवली कांदोळकरांची डोकेदुखी

म्हापसा – गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यात तृणमूल कॉंग्रेसने (Trinamool Congress) आपल्या प्रचाराला जोर लावला आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक पक्षातील नेत्यांनी टीएमसीत पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच टीएमसीची ताकद वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे.

तृणमूल काँग्रेसने आज तिसरी उमेदवार यादी (Candidate List) जाहीर केली आहे. या यादीत 6 जणांचा समावेश आहे. या यादीमध्ये तारक आरोलकर (म्हापसा), भोलानाथ साखळकर (साळगाव), जयेश शेटगावकर (मुरगाव), सैफुल्ला खान (वास्को), कांता गावडे (केपे) तर राखी नाईक (सांगे) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

यापैकी तारक आरोलकर यांना देण्यात आलेली उमेदवारी ही कॉंग्रेससाठी हळडणे आणि म्हापसा या मतदार संघासाठी डोकेदुखीचा विषय बनणार आहे . तारक आरोलकर हे म्हापसा नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ७ मधून निवडून आले होते. तर वार्ड क्रमांक ८ मध्ये त्यांचा भाऊ विकास आरोलकर हे निवडून आले. यानंतर दोघे भाऊ भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मात्र ४ महिन्यातच भाजपला सोडून त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

आरोलकर यांना सध्याचे कॉंग्रेसचे म्हापसाचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे कॉंग्रेसमध्ये घेऊन गेले. आरोलकर यांची हळडणे मतदार संघात आमदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. तसेच त्यांना सुधीर कांदोळकर,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांनी तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे आरोलकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. दरम्यान, आता कॉंग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेल्या मायकल लोबो यांनी आरोलकर यांचा पत्ता कट केला. कॉंग्रेसने त्या मतदारसंघात कार्लोस फरेरा यांना तिकीट दिले. यानंतर आता आरोलकर यांनी किरण कांदोळकर यांच्या नेतृत्वात तृणमूल पक्षात जाऊन म्हापसामधून उमेदवारी मिळवली आहे.

म्हापश्यात कॉंग्रेस आणि सुधीर कांदोळकर यांच्यासाठी ही घडामोड डोकेदुखी ठरणार आहे. कारण आरोलकर हे कांदोळकर यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. म्हापसा २०१९ च्या पोटनिवडणुकीत आरोलकर हे कांदोळकर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरले होते. त्यामुळे कांदोळकर यांची बलस्थाने आरोलकर यांना चांगलीच ठावूक असल्याने कांदोळकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचे दिसून येत आहे.