कसबा पोटनिवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनीही लावली ताकद; रासनेंना मिळणार बळ

Pune Bypoll Election: पुणे शहरातील कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. आता या जागेसाठी पोटनिवडणूक लागली असून या निवडणुकीत महायुती (भाजपा, शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,रयत,रासप,) आणि महाविकास आघाडी हे आमने सामने असणार आहेत. यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्हीही बाजुंनी जोरदार तयारी सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असला तरीही कुठे ना कुठे महायुती पक्ष या प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

कसबा मतदारसंघातून भाजपकडून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारी न देता, हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेस लढवणार आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी प्रमुख लढत बघायला मिळू शकते.

कसबा पोटनिवडणुकीसाठी फार कमी दिवस उरले असल्याने महायुतीच्या नेत्यांकडून खांद्याला खांदा लावून प्रचार सुरू आहे. स्वत: भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते हेमंत रासने मैदानात उतरले असून सभा घेत, पदयात्रा काढत त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. हेमंत रासने यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ यांच्याद्वारेही प्रचाराचा धडाका लावला आहे.

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शिंदे गटाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील प्रचारासाठी पुणे गाठणार आहेत. तसेच स्वत: केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) १८ आणि १९ फेब्रुवारीला प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून तर सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू आहे.

याखेरीज  शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, पतित पावन संघटना, रयत यांद्वारेही जोर लावला जात आहे.या महायुतीच्या घटक पक्षांनी देखील ग्राउंड लेव्हल ला काम सुरू केले आहे. रासपचे महादेव जानकर यांनी प्रचाराला हजेरी लावली आहे तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील या प्रचारात सहभागी होणार आहेत. शिवसंग्राम देखील चांगली मेहनत करताना दिसून येत आहे. शिंदे गट तर सुरुवातीपासून नियोजनात असून नाना भानगिरे हे देखील या निवडणुकीत अतिशय चांगले काम करत आहेत. आता या मेहनतीचे नेमके फळ महायुतीला मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल.