मोदी 2 तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयोग : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बढाया मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता त्यांनी जी बढाई मारली आहे ती पाहून कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पोट धरून हसतील अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे नंतर 24 तास ते जागेच राहतील, असे वक्तव्य पाटील यांनी कोल्हापूर येथे केले आहे.

पाटील  म्हणाले, 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. संसदेत अनेक गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी एक तृतीयांश बहूमत पाहिजे. कोणत्या गोष्टी करायच्यात, ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कामाला लागा, 2024 मध्ये आपलीच सत्ता आली पाहिजे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकजण पाटील यांच्या या वक्तव्याची जोरदार खिल्ली उडवत आहेत. यापूर्वी देखील पाटील यांनी बोलताना अनेकदा बढाया मारल्याचे दिसून आले आहे मात्र यावेळी पाटील यांनी कहरच केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.