‘केतकीला पवार साहेबांच्या पायापर्यंत नाही आणलं ना तर नावाची सविता मालपेकर नाही’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलं आहे. केतकीला पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर केलेली ती वादग्रस्त पोस्ट ही 2020 सालची असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी ही पोस्ट तितकी व्हायरल झाली नव्हती, मग आता ती रीपोस्ट करून व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या अभिनेत्री सविता मालपेकर (Actress Savita Malpekar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या, तिची पोस्ट वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर माझा संताप होत आहे. मी एक कलाकार म्हणून सांगतेय आणि राष्ट्रवादीची सांस्कृतीक सेलची प्रदेश सरचिटणीस म्हणून मी तिला सांगू इच्छिते याच्यापुढे जर तू असं काही बोललीस आणि जे बोलली आहेस ते शब्द जर मागे घेतले नाहीस आणि पवार साहेबांची माफी मागितली नाहीस तर तू जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून काढून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही ना तर नावाची सविता मालपेकर नाही. हे लक्षात ठेव.