किशोर आवारे यांना संपवण्याचा कट पाच महिन्यापूर्वीच रचला, आरोपींच्या जबाबात धक्कादायक बाबी आल्या समोर  

पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे (Kishore Aware) यांची नुकतीच दिवसाढवळ्या हत्या (Murder of Kishore Aware) करण्यात आली. तळेगावात अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले.  पण पोलिसांनी 24 तासात सूत्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या जबाबानुसार नगरसेवक भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदेला अटक केली आहे. गौरवच या हत्याकांडाचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं आहे.

काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. गौरव खळदेची आणि हत्या करणारा शाम निगडकर यांची मैत्री होती. गौरव खळदे हा शामला वेळोवेळी आर्थिक मदत करत होता. याचं मैत्रीखातर शाम निगडकर आणि त्याच्या साथीदारांकडून किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. यासाठी जानेवारीपासून किशोर आवारे याच्या हत्येचा कट रचण्यात येत होता. तर गेल्या महिन्याभरा पासून हे आरोपी रेकी करत होते. अखेर नगरपरिषदेच्या कार्यालयातच आवारे यांना मारेकऱ्यांनी गाठलं आणि त्यांची हत्या केली.