एका विधवा बाईने ठरवलं आपल्या पतीच वारसा पुढे न्यायचा, तुम्ही का मुस्कट दाबी करताय?

Andheri East Bypoll 2022 : – शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. यातच आता अंधेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत असून ही निवडणूक दोन्ही गटांनी अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे.

या जागेवर भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना संयुक्त उमेदवार देणार असून त्याची थेट लढत काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराशी होणार आहे. या निवडणुकीत दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे मात्र उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे.

ऋतुजा लटकेंना भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे देखील वृत्त आहे, यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले आहे. एका विधवा बाईने ठरवलं आपल्या पतीच वारसा पुढे न्यायचा, तुम्ही का मुस्कट दाबी करताय? तिची बांधिलकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे असा दावा त्यांनी केला आहे.