Sunil Tatkare | २०४७ चे व्हिजन तयार करणाऱ्या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे सरकार काम करतेय

Sunil Tatkare | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सन २०४७ हे व्हिजन आहे. २०४७ हे व्हिजन का आहे तर या देशाच्या गौरवशाली स्वातंत्र्याच्या इतिहासाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. २०४७ चे व्हिजन ज्या नेतृत्वाने तयार केले आहे त्या नेतृत्वाचे हात राष्ट्रीय पातळीवर बळकट करण्यासाठी महायुतीचे सरकार अधिक गतिमान पध्दतीने काम करत आहे. त्यांची ताकद वाढवणे आणि अधिक शक्तीमान करणे व रायगडसह कोकणात विकास साधणे या त्रिसूत्रीवर आशिर्वाद मिळावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी इंदापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

जगाच्या पाठीवर देशाला विकसित राष्ट्रांच्या बरोबरीत नेण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. आज राष्ट्रहित लक्षात ठेवायचे आहे. स्थिर सरकारची आवश्यकता आहे. हे स्थिर सरकार मनमोहन सिंहांच्या युपीएच्या सरकारनंतर सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन झाले आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ठेवले आहेत. त्याच एनडीएच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षे विकसित राष्ट्रांच्या बरोबरीत वाटचाल करणार आहोत असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

जनतेला आधाराची गरज असते. त्यांना काही नाही मिळाले तरी आपला लोकप्रतिनिधी भेटला याचे समाधान लोकांच्या चेहर्‍यावर असते. संकटकाळात तुम्ही किती लोकांच्या उपयोगी पडता हे महत्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या
संविधानातून तुम्हाला जे पद मिळाले आहे त्या पदाचा उपयोग लोकांचे अश्रू पुसण्यासाठी करायचा असतो याचे भान लोकप्रतिनिधींना असायला हवे असा हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी अनंत गीते यांचे नाव न घेता केला.

अनंत गीते यांना प्रचारादरम्यान पत्रकारांनी रायगड मतदारसंघात आलेल्या संकटकाळात तुम्ही कुठे होता असा प्रश्न केला त्यावेळी त्यांनी तो हसण्यावारी नेला याचा अर्थ त्यांना जनतेच्या दु:खाची कदर नाही त्यामुळे ही जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.

ज्यांनी ३० वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यांच्या विकासासाठी कंदील लावावा लागतो आहे. तरीही तो दिसत नाही एवढी तफावत आहे. संकटकाळात एकदाही न फिरकलेल्या अनंत गीतेंना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

‘लेक माझी लाडकी’ ही योजना अदिती तटकरे हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणून महिला आणि लेकींसाठी व बहुजन कल्याणासाठी उचललेले महत्वाचे पाऊल आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिशा दिली ती बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत असले पाहिजे. ती दिशा घेऊनच आज आम्ही मार्गक्रमण करीत आहोत असेही सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी यावेळी सांगितले.

कुणीही गाफील रहायचे नाही. विकासाच्या जोरावर आपल्याला सुनिल तटकरे यांना निवडून आणायचे आहे. ४० हजार पार मताधिक्य देणार असल्याचा शब्द आमदार भरत गोगावले यांनी देतानाच जे टॉपटेन खासदार निवडून येणार आहेत त्यात सुनिल तटकरे यांना निवडून आणायचे आहे असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी यावेळी केले.

श्रीवर्धन मतदारसंघातील इंदापूर येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाप्रमुख सुभाष केकाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब