किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढणार? एसआरए प्रकरणी गुन्हा दाखल

Kishori Pednekar :  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर  (Kishori Pednekar)  यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए (Worli Gomata SRA) प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात (Nirmal Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाईही झाली होती.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किशोरी पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आलं होतं. मुंबई महानगरपालिकेने किशोरी पेडणेकर यांचे एसआरए कायद्यानुसार घर आणि कार्यालय सील केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेवरुन गंभीर आरोप केले होते.