भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर सर्वत्र कुंकूचीच चर्चा; पण भारतीय महिला कुंकू का लावतात? त्याचे फायदे काय?

तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो’, असे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले आहे. संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी संभाजी भिडे यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानावरून वातावरण चांगलेच तापले आहे. यावर राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्या विधानाची चर्चा सुरू आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का, हे कुंकू बनवले कसे जाते, भारतीय महिला कुंकू (Kunku) का लावतात आणि कुंकू कशा पद्धतीने लावावे? तर तुमच्या या सर्व शंकांचे निरसन आम्ही या लेखातून करणार आहोत.

भारतीयांमध्ये ‘कुंकू’ या सौदर्य साधनाला फार महत्त्वाचं स्थान आहे. कुंकू हे महत्वाचं ‘सौभाग्य लेणं’ असल्यामुळे विशेषतः विवाहीत महिला कुंकू लावतात. महिलांनी कपाळ आणि केसांच्या मध्यभागी म्हणजेच भांगेमध्ये कुंकू लावण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील सांगितले जात आहेत. आजकालच्या आधूनिक जीवनशैलीत कुंकवाची जागा टिकली या सौंदर्यसाधनाने घेतली आहे. मात्र असं असली तरी लग्न, सणासुदीला आणि अनेक धार्मिक विधींसाठी कुंकू आवर्जून वापरलं जातं.

भारतीय महिला महिला कुंकू का लावतात?
भारतीय महिलांमध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी कपाळावर कुंकू लावण्याची पद्धत आहे. कुंकू लावण्यामुळे महिलांचा चेहरा उठावदार दिसू लागतो. जितकं मोठं आणि ठसठसीत कुंकू तितका चेहरा आकर्षक वाटतो. कुंकू सौंदर्याप्रमाणेच सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जातं. यासाठी लग्नानंतर हळदी कुंकू वाटण्याची पदधत आहे.

घरीच कुंकू तयार कसे करावे?
साहित्य –
एक कप हळद, एक कप चूना अथवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड, गुलाबपाणी, एक चमचा गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट

कसे तयार कराल घरच्या घरी कुंकू –
एका भांड्यामध्ये हळद आणि चुना अथवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड एकत्र मिसळा. त्यात गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट मिसळून मिश्रण एकजीव करा. मिश्रण एकजीव करताना त्याचा रंग बदलू लागतो. नारिंगी रंगाचे मिश्रण हळू हळू लाल गडद होऊ लागते. कुंकू सुकल्यावर त्याची पावडर एका डबीत भरून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला घरीच तयार केलेले कुंकू वापरता येईल. जर तुम्हाला लाल रंगाचे कुंकू हवे असेल तर गरजेपुरते कुंकू तयार करा. कारण ते फार काळ ठेवल्यामुळे पुन्हा हलक्या रंगाचे दिसू लागेल.

कुंकू लावण्याचे फायदे
सहसा कुंकू दोन भुवयांच्या मध्ये किंवा भुवयांच्या वर, कपाळाच्या मध्यभागी लावलं जातं. अशा वेळी त्या भागात थोडासा दाब दिला जातो. हे तेच बिंदू असतात ज्यामुळं चेहर्‍याच्या स्नायूंचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो असं सांगितले जाते.

कुंकू कधी आणि कसं लावावं?
अंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावणं फायद्याचं ठरतं. असं केल्यामुळं शरीरात कुंकवाची ताकद संचारते असं म्हणतात.