पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वागण्यामुळे मी नाराज नसून हैराण – सुप्रिया सुळे 

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना इंधन दरवाढीसाठी (fuel price hike) सर्वस्वी राज्य सरकारांना (State GOV)  जबाबदार ठरवल्यामुळे त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. इतर बिगर भाजप शासित (Non-BJP ruled) राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातूनही या दाव्यांचा राजकीय विरोध करण्यात येत असून त्यावरून राजकारण तापू लागलं आहे. पंतप्रधान मोदींनी इंधन दरवाढीसाठी राज्य सरकारांना जबाबदार ठरवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वागण्यामुळे मी नाराज नसून हैराण आहे असा सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत टोला लगावला. पालघरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, करोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असताना त्यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना इंधन दरवाढीसाठी सर्वस्वी राज्य सरकारांना जबाबदार ठरवलं. पंतप्रधानांच्या या वागण्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नसून हैराण आहे.

मी लोकसभेत आणि वैयक्तिक भेटल्यानंतरही तसं सांगितलं आहे. पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक (गुड्स स्टेस्ट्समन) सामान्यांना अपेक्षित आहे. त्याऐवजी आमचे पंतप्रधान सदासर्वकाळ राजकारणी म्हणून वागत असतात.ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे, असा खेद सुप्रिया सुळे यांनी पालघरमध्ये व्यक्त केला.