Kuwait Fire News | कुवेतमध्ये आगीत मृत्यू झालेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह आज भारतात आणले जाणार

कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत (Kuwait Fire News) मृत्यू झालेल्या ४५ भारतीय नागरिकांचे मृतदेह आज विशेष विमानानं भारतात आणले जाणार आहेत. मृतांमध्ये केरळमधले २३ नागरिक असल्यामुळे हे विमान आधी कोचीमध्ये उतरेल आणि त्यानंतर दिल्लीला रवाना होईल अशी माहिती कुवेतमधल्या (Kuwait Fire News) भारतीय वकीलातीनं दिली आहे.

दरम्यान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग काल कुवेतला पोहोचले असून मृतदेह शक्य तितक्या लवकर भारतात आणण्यासाठी आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी त्यांनी कुवेतमधल्या सरकारसोबत चर्चा केली.

दरम्यान, केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. केरळ सरकारनेही मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर कामगार तळाच्या मालक असलेल्या एनबीटीसी ने प्रत्येक पीडीतांच्या कुटुंबाला ८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर संयुक्त अरब अमिराती स्थित लुलु या व्यापारी समूहाचे अध्य़क्ष उद्योगपती एमए युसुफअली यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप