राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, खासदार मोहम्मद फैजल यांना हत्येच्या प्रयत्नात १० वर्षांचा तुरुंगवास

लक्षद्वीप: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नेत्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नबाव मलिक यांना तुंरुगवासाची शिक्षा भोगावी लागली. अनिल देशमुख काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आले असून नबाव मलिक अजूनही गजाआड आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद फैजल (Mohammad Faizal) असे त्यांचे नाव आहे.

लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते महाराष्ट्राबाहेरील राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत. याच मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा लक्षद्वीप कोर्टाने बुधवारी सुनावली. कवरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २००९ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला, असे या प्रकरणाशी संबंधित वकिलांनी सांगितले आहे.

वकिलांच्या म्हणण्यानुसार, माजी केंद्रीय मंत्री पी.एम. सईदचे जावई पदनाथ सालीह २००९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एका राजकीय मुद्द्यावर हस्तक्षेप करण्यासाठी त्यांच्या जवळ पोहोचले तेव्हा त्यांच्यावर खासदार फैजल आणि इतर आरोपींनी हल्ला केला होता. या आदेशाला मोहम्मद फैजल उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. यावेळी बोलताना खासदार मोहम्मद फैजल यांनी ही बाब राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. या आदेशाला लवकरच उच्च न्यायालयात अपील करून आव्हान देणार असल्याचे खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले.