आमची किंमत काय ते येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ – मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal:- मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लावला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. जसे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काम करतय तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज बीड येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महादेव जानकर,प्रकाश शेंडगे,नारायणराव मुंडे, प्रा.लक्ष्मण गायकवाड, शब्बीर अन्सारी, समीर भुजबळ, प्रा.टी.पी.मुंडे,अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे,कल्याण दळे, दौलतराव शितोळे, सचिन साठे, चंद्रकांत बावकर, डॉ.स्नेहा सोनकाटे, डॉ सुदर्शन घेरडे, प्रा.पी टी चव्हाण,ॲड.सुभाष राऊत यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी स्व.गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. गोपीनाथराव मुंडे आज असते तर ओबीसींचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते. पण ओबीसींच्या नशीबी हे दुर्दैव आलं आणि ओबीसींच्या संकटांची मालिका सुरू झाली. या विरुद्ध आपल्याला लढावे लागणार आहे. गेली दोन तीन महिने आंदोलन सुरू होते आपल्या विरोधात खालच्या पातळीवर शिवीगाळ सुरू होती. तरी देखील आपण काहीही बोललो नाही. मात्र बीड पेटले, आमदारांचे घरे, कार्यालये जाळली गेली. सुभाष राऊत यांचं हॉटेल जाळलं गेलं. हे सर्व अचानक झालं नव्हत तर प्लॅन करून सर्व घडविण्यात आल याविरुद्ध आपण गप्प बसायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, इतिहास असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले. इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले. ते मावळे म्हणजे भटके विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार समाजाचे होते. पण आता छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले केले जात आहेत. छत्रपतींसाठी जीवाची बाजी लावून लढवणाऱ्यांचीच आज घरं पेटवता तुम्ही? त्यांची लायकी काढता? असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.

ते म्हणाले की, आरक्षणासाठी जे लोक आंदोलन करत आहे. त्यांना काही लोक रसद पुरवीत आहे. काही लोक शांत आहे. जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, पण जे आमच्या विरोधात काही लोकांना शक्ती देत आहेत त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल. हे जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. तसेच आमची किंमत काय आहे ते येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, राज्यात वातावरण बिघडविण्याचे आरोप आमच्यावर केले जाताय. त्यांना सांगायचं आहे की आम्ही जाळपोळ केली नाही, कुणाला मारहाण केली नाही, दादागिरी केली नाही असा सवाल उपस्थित केला. ज्या वकिलांनी कुठलीही फी न घेता जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना जामीन मिळवून दिला त्यांचा सत्कार हे करता आहे. अगदी सरकारने गुन्हे दाखल करू नये असे इशारे देत आहे. त्यातून यामागे कोण आहे हे सर्वांना समजले आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच जालना जिल्ह्यात २०० हून अधिक गावठी कट्टे आले, अगदी पाच हजारात विक्री झाली, जे आंदोलन करता आहे. त्यांच्या आंदोलनात देखील बंदुका घेऊन लोक सहभागी झाले मात्र पोलिसांकडून कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करून पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण कदापिही मिळणार नाही. या अगोदर अनेक आयोगांनी ते सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाही हे सिद्ध केलं आहे त्यांनी आरक्षण देण्यास विरोध दर्शविलेला आहे. आता मात्र ओबीसी आयोग हे मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ मराठा समाजासाठी काम करतोय का ? हा आयोग ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे ? असा सवाल उपस्थित केला. तसेच देशाच्या मुख्य न्यायमूर्तींचा पगार २ लाख ८० हजार आणि इकडे आयोगाच्या न्यायाधीशांना ४ लाख ८० हजार एवढा पगार दिला जातोय हा प्रकार नेमका काय आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ओबीसींच्या प्रश्नावर आपण सरकारमध्ये तर बोलतच आहोत आणि इथेही बोलणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की नाशिकमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यावेळी देखील कोणी नाशिक बंद करण्याचे आदेश दिले नाही. मात्र त्यांच्या सभा असल्या की शाळांना सुट्टीचे आदेश दिले जातात अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, भुजबळांना पाहून घेऊ अशा धमक्या दिल्या जातात. त्यांना मला सांगायचे आहे की,बेटा छोड दे ये हतियारो की बात, हमसे क्या टकराऐगा, जोजो हमसे टकराऐगा वो मिट्टी मे मिल जाएगा असे छगन भुजबळ यांनी नाव न घेता जरांगेना इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, अजितदादा फक्त एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक आल्यानंतर फक्त कायदा व सुव्यवस्था बिघडता कामा नये, एवढीच काळजी घ्या. तर त्यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषा वापरली गेली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत किती घाणेरडी भाषा वापरली गेली. इतका असंस्कृतपणा? एवढी मस्ती कुठून आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, गोरगरिबांच्या हक्काचे आरक्षण वाचवणे तुमचं आमचं काम आहे आणि कायदा हातात घेणार नाही. मात्र संविधानाने दिलेला अधिकार गाजवणार. आम्ही पेटविनारे नाही पटवणारे आहोत, आम्ही तोडणारे नाही घडवणारे आहोत असे सांगत करत आम्ही देखील मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच ते म्हणाले की, समाजाने दबाव निर्माण केला पाहिजे. आज ओबीसी संकटात आहे. त्यासाठी दलित आदिवासी बांधव एकमेकांना साथ देत आहेत.एकत्र येऊन लढले पाहिजे असे सांगत जिते वही है जो शेर होते है, बाकी सब मिट्टी के ढेर होते है या शायरीने सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी क्षीरसागर कुटुंबियांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी वसीम शेख, जलील अन्सारी, सत्तार शेख, अझीम शेख यांनी त्यांना वाचवलं. आपली धार्मिक प्रार्थना बाजूला ठेवून त्यांनी हे माणुसकीचं काम केलं. याबद्दल आज ओबीसी मेळाव्याच्या मंचावरून त्या सर्वांचा जाहीर सत्कार केला. यावेळी राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त वंदन केले. तसेच आपल्या हॉटेलची जाळपोळ होऊन देखील ओबीसींच्या लढ्यात योगदान देत असलेल्या सुभाष राऊत यांचं खास कौतुक करत यापुढील काळातही आपलं काम सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार