उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीशी महाविकास आघाडीचा संबंध नाही; नाना पटोले स्पष्टच बोलले

मुंबई- काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये युती झाली. या युतीनंतर राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे. परंतु आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आता प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी संबंध नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. याबाबत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पटोले म्हणाले. ते गोंदियात (Gondia) एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.

पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पहाटेला स्थापन झाले होते. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो. जे लोक पहाटेच्या सत्तेत होते त्यांनाच विचारा. महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाच हा प्रश्न विचारा, असे नाना पटोले म्हणाले. राज्यातील सरकार हे असंवैधानिक असून, राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण पत्रच दिले नसल्याची बाब समोर आली असल्याचे पटोले म्हणाले.