मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाही; भाजप पदाधिकाऱ्यांचा निर्धार

नाशिक – दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडी चांगलाच जोर लावताना दिसत आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet Tambe) यांना अद्यापही भाजपने आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढू शकतात.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने शुभांगी पाटील (shubhangi patil )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना देखील दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे. याशिवाय स्वराज्य संघटनेचे नेते सुरेश पवार (suresh pawar) यांनीही नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यामुळे ही लढत दुरंगी नव्हे तर तिरंगी झाली असून भाजपच्या भूमिकेवर सर्वांचेच भवितव्य अवलंबून असणार आहे.

यातच आता भाजपमधून सत्यजित तांबे यांना विरोढ वाढू लागला आहे. तांबे यांच्या विरोधात भाजपामधील काही नेत्यांनी नंदुरबारमध्ये (Nandurbar) तीव्र निदर्शने केली. मोदींच्या फोटोला काळं फासणाऱ्यास आम्ही मतदान करणार नाही, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पोस्टरला महागाई विरोधाच्या आंदोलनात काळे फसले होते. ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नागरिकाचा सन्मान करता येत नाही. त्याला भाजपाने पाठिंबा देऊ नये आणि पक्षाने पाठिंबा दिला तरी सुज्ञ नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते अशा उमेदवाराला मतदान करणार नाहीत, असा इशारा नंदुरबारमधील भाजप पदाधिकारी लक्ष्मण माळी यांनी दिला आहे.