पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो, महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाच प्रश्न विचारा – पटोले 

 Nana Patole  : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या एका मोठ्या घटनेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फार मोठं वक्तव्य केलं आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या तसेच पवारांच्या भूमिकेबाबत देखील उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. यानंतर बढाई मारण्याच्या नादात आपल्याच नेत्याला अडचणीत आणल्याचे लक्षात आल्यानंतर आता जयंत पाटील यांची दुसरी प्रतिक्रिया आली असून आता मात्र त्यांनी सारवासारव केली आहे.

दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेच्या सत्तेत आम्ही नव्हतो. जे लोक पहाटेच्या सत्तेत होते त्यांनाच विचारा. महाराष्ट्राला काळीमा लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनाच हा प्रश्न विचारा, असे नाना पटोले म्हणाले. राज्यातील सरकार हे असंवैधानिक असून, राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण पत्रच दिले नसल्याची बाब समोर आली असल्याचे पटोले म्हणाले.