महाराष्ट्र बनणार एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे देशातले पहिले राज्य – तपासे

मुंबई – कोरोनाच्या संकटावर मात करत महाविकास आघाडी सरकारने आजच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला पुनश्च एकदा प्रगतीपथावर नेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडताना या पंचसूत्रीचा आधारावर महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे देशातले पहिले राज्य बनणार असल्याचे जाहीर केले.

महाविकास आघाडीच्या सुनियोजित कारभारामुळे महाराष्ट्राचा विकासदर १२.१ टक्के होण्याच्या मार्गावर आहे. कोविडकाळात अर्थचक्र मंदावलेल्या असतानादेखील महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने जवळपास १ लाख ८९ हजार कोटीची गुंतवणूक करण्याच्या संदर्भातले करार केले व त्यामुळे ३ लाख ३० हजार नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असल्याचे महेश तपासे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युध्द पध्दतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव,महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद, आदिवासी, मागासवर्गीय यांच्या योजनेसंदर्भात भरीव तरतूद, बार्टी या संस्थेला २५० कोटीची तरतूद, तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल व व्याज सवलतीची स्वयंरोजगार योजना, ओळखपत्र व शिधापत्रिका, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून १० हजार ५०० किलोमीटरचे रस्ते, सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, अल्पसंख्यांक उमेदवारांना पोलीस भरती प्रशिक्षण योजना, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढून सातशे कोटी रुपये केले, इ-शक्ति योजनेतून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात येईल अशी अनेक वैशिष्ट्ये या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजितदादा पवार याचे अभिनंदन महेश तपासे यांनी केले आहे.