‘यांना गणित आणि भौतिकशास्त्र शिकवायला शाळेत जे शिक्षक होते, त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही’

मुंबई : मी शाळेत असताना मला अंतराळवीर (Astronaut) होऊन चंद्रावर जायचे होते. पण गणित आणि भौतिकशास्त्रात (Physics) फारशी गती नसल्याने ते स्वप्न अपूर्ण राहिले, अशी खंत शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. ते बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

मी तिसरी-चौथीत असताना मला अंतराळवीर व्हावं, असं वाटत होतं. नासा (NASA) किंवा इस्रोच्या माध्यमातून मला चंद्रावर जायचे होते. पण अंतराळवीर होण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्राच अभ्यास करावा लागतो, हे पुढे जाऊन मला कळाले. तेव्हापासून अंतराळवीर होण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला गळती लागली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपण राजकारणात का आणि कसे आलो, याचे कारणही स्पष्ट केले. अंतराळवीर होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर नंतर मग मी ठरवलं की राजकारणात जाऊ. राजकारणात जाण्यासाठी काहीच लागत नाही. त्यामुळे मी राजकारणात आलो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याची खिल्ली मनसेचे नेते कीर्तीकुमार शिंदे यांनी उडवली आहे. ते म्हणाले, यांना गणित आणि भौतिकशास्त्र शिकवायला शाळेत जे शिक्षक होते, त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. अंतराळवीर बनून चंद्रावर गेले असते तर किमान पृथ्वीवरचं- महाराष्ट्राचं पर्यावरण तरी सुरक्षित राहिलं असतं!! असं शिंदे यांनी म्हटले आहे.