‘मी दलित होतो म्हणून ५ मुलींनी नकार दिला’, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) हा सध्या चर्चेत आहे. पृथ्वीक प्रताप त्याच्या नावापुढे आडनाव लावत नाही. यावरुन त्याला अनेकदा प्रश्न करण्यात आले आहेत. आता अखेर संपूर्ण स्वराज्य या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपण आडनाव का लावत नाही, याचा खुलासा केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक गौप्यस्फोटही केले आहेत.

पृथ्वीक त्याच्या नावासमोर आडनाव लावत नाही. त्याला या मुलाखतीत याचं कारण विचारलं असता तो म्हणाला, ‘तुम्ही जेव्हा कुलकर्णी, शिंदे, पाटील अशी आडनावं सांगता त्यावरून लगेचच तुम्हाला जज केलं जातं की तुम्ही कोणत्या जातीचे आहात. मी लहानपणापासून माझ्या खूप जवळच्या मित्रांना यामधून गेलेलं पाहिलं आहे, तो त्रास मला सहन होत नाही. आडनाव पाहून एका विशिष्ट चौकटीत तुम्हाला अडकवलं जातं. मला माझ्या जातीबद्दल कमीपणा वाटतो असं मुळीच नाही. सगळ्यांना त्याचा आदर आहे. पण आडनाव जर काढून टाकलं तर तुम्ही त्या व्यक्तीला माणूस म्हणून ट्रीट करता. आपल्याला फक्त नावावरूनच का ओळखले जाऊ नये. आडनाव सांगितलं की लगेचच तुम्ही त्याची जात शोधायला लागता.’

पुढे तो म्हणाला, ‘माझे पाच ब्रेकअप तर याच कारणामुळे झालेले आहेत. तिघी जणींनी तर मला जातीवरून रिजेक्ट केलं आहे. चौथी माझी गर्लफ्रेंड होती. तिचे आईबाबा आजही माझ्याशी तेवढ्याच आपुलकीने बोलतात, मला त्यांच्या घरी बोलावतात, खाऊ घालतात. सगळं काही छान होतं पण नंतर नंतर तिने माझ्या कामावर, माझ्या पगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. नकार द्यायचा म्हणून ती वेगवेगळी कारणं शोधत होती. पण मग शेवटी तिने आपली जात एक नाही म्हणून नकार दिला. खरं तर अगोदर याच कारणामुळे मला तिघीनी नकार दिला होता हिने केवळ डायरेक्ट नकार न देता गोष्ट फिरवण्याचा प्रयत्न केला.’

पृथ्वीक आडनावाबद्दल बोलताना म्हणाला, ‘मला कोणत्याही जातीबद्दल कधीच आक्षेप नाही. ज्या त्या जातीला सन्मान मिळायलाच हवा. पण मग तुम्ही आडनावावरून त्या व्यक्तीची तुलना करता. मी ‘कांबळे’ नसतो ‘कुलकर्णी’ असतो तरीही मी माझं आडनाव लावलं नसतं. फक्त नावावरून तुम्ही माणूस म्हणून ओळखलं जावं एवढीच माझी इच्छा आहे.’