‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकणार लग्नबंधनात, तारिख आली पुढे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. वनिता तिचा प्रियकर सुमित लोंढे (Sumit Londhe) याच्याशी पुढीलवर्षी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सुमितसोबतच्या आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता लवकरच ते दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार असून त्यांच्या घरी लगीन घाई सुरू झाली आहे.

वनिता तिच्या कॉमेडी करण्याच्या कौशल्यामुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घरोघरी पोहोचली आहे. मराठीबरोबरच हिंदी सिनेमातही वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. आता कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना तिने विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, वनिता फेब्रुवारी २०२३मध्ये लग्न करणार आहे. सध्या तिने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. तिचं लग्न कुठे असणार, लग्नाला कोण कोण उपस्थित असणार याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

दरम्यान वनिताचा प्रियकर सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमितने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.