सुषमा अंधारे तुमचं आडनाव ‘आगलावे’ करा; भाजपाच्या आशिष शेलार यांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: “सुषमा अंधारे तुम्ही तुमचं आडनाव बदलून सुषमा आगलावे असं करा,” असा खोचक टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या शिंदे गट आणि भाजपावर नेहमी टीका करताना दिसतात. त्यामुळे सुषमा अंधारे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या ‘फायरब्रँड नेत्या’ असंही म्हटलं जातं. नेहमी आपल्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या सुषमा अंधारे यांना आता भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ऍड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) हल्लाबोल करताना म्हटले की, “सुषमा अंधारे यांना माझी हात जोडून विनंती आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमची वक्तव्य, कर्तृत्व आणि तुमची भाषणं हे संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय आणि ते सर्व ऐकल्यानंतर आम्ही विनंती करतो की, तुम्ही तुमचं आडनाव सुषमा अंधारे ऐवजी बदलून आता सुषमा आगलावे करा.”

“स्वतःच्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा करणं हे बरं नव्हे,” असंही यावेळी आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.