‘बीडची जनता पवारांना सोडून गेलेल्यांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त करणार’

मुंबई : गुरुवार 17 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा होणार आहे. विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच राजकीय सभेकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना बीडची जनता पूर्ण ताकतीने देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे जंगी स्वागत करणार अशी माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिली.

पवार साहेबांच्या या सभेमुळे पक्षाला सोडून गेलेल्या अनेक नेत्यांचे धाबे दणाणले असून या सर्व नेत्यांच्या मनात आगामी निवडणुकीत स्वतःचे डिपॉझिट जप्त होण्याची भीती पसरू लागली आहे व त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते देखील उद्या पवार साहेबांच्या सभेला हजेरी लावणार आहेत अशी माहिती महेश तपासे यांनी दिली.

मराठवाड्यातला बीड जिल्हा हा राजकीय रीत्या अतिशय संवेदनशील जिल्हा आहे व सदैव बीड जिल्ह्याने पवार साहेबांच्या विचारांना साथ दिली आहे. येथे पवार साहेबांना मानणारा मतदारांचा फार मोठा वर्ग आहे व ही जनता आज पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभी आहे असे तपासे म्हणाले.

बीडच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सबंध राज्यभर प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी पक्षाच्या निष्ठावंतांना भेटून भाजप विरोधी राष्ट्रवादीची भूमिका जनतेत मांडणार असल्याची कबुली महेश तपासे यांनी यावेळी दिली.

पक्षाच्या आदेशा विपरीत भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक आमदारांचे मन परिवर्तन बीडच्या सभेनंतर होण्याची शक्यता तपासे यांनी बोलवून दाखविली व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शरद पवार साहेबांच्या सोबत निष्ठावंतांची फौज उभी राहिलेली आहे व त्याला राज्यातल्या तरुणाईची भरघोस साथ मिळत आहे असेही तपासे पुढे म्हणाले.