Auto Expoमध्ये मारुतीचा धमाका! लॉन्च केली अशी कार; जी ह्युंडई, महिंद्रा आणि टाटाला देईल टक्कर

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) ऑटो एक्सपोमध्ये (Auto Expo) पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता मारुतीने बॅलिनोचे क्रॉस व्हर्जन फ्रॉन्क्स (Fronx) लॉन्च केले आहे. एसयूव्हीच्या डिझाईनपासून प्रेरित फ्रॉन्क्स लाँच केल्याने ह्युंदाई, महिंद्रा आणि टाटा यांच्यासाठीही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. फ्रॉन्क्सचे डिझाईन लोकांना खूप आवडले आहे आणि कंपनीने त्यात बरेच फीचर्स देखील दिले आहेत.

फ्रॉन्क्सच्या डिझाईनबद्दल (Fronx Features) बोलायचे तर, ते ग्रँड विटारापासून काहीसे प्रेरित दिसते. त्याची फ्रंट ग्रिल पूर्णपणे ग्रँड विटारासारखी आहे. त्याच वेळी, बॅलिनोपेक्षा अधिक ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. या कारची साइड आणि बॅक प्रोफाइल याला संपूर्ण एसयूव्ही लूक देते.

ही कार दोन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. दोन्ही पेट्रोल इंजिन आहेत ज्यात 1.2 लिटर चार सिलेंडर ड्युअलजेट आणि 1.0 लीटर बूस्टरजेट इंजिन उपलब्ध असतील. यासोबतच कीलेस एंट्री, 360 डिग्री कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखे खास फिचर्स कारमध्ये पाहायला मिळतील.

फ्रॉन्क्स लाँच झाल्यामुळे आता बाजारात स्पर्धा वाढताना दिसणार आहे. फ्रॉन्क्स टाटा पंच, रेनॉल्ट किगर, निसान मॅग्नाइट, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट सारख्या वाहनांना टक्कर देईल. यासोबतच मायलेजसाठी ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीवरील लोकांचा विश्वासही एक मोठा घटक म्हणून उदयास येईल.