भाजपमध्ये पुन्हा सुरु होणार मेगाभरती? कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यापासून होणार सुरुवात?

नागपूर : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) महिन्याला एक खोका मिळतो असा गंभीर आरोप केला. याशिवाय मी माफी मागायला राहुल गांधी (Rahul Gandhi) नाही असंही वक्तव्य केलं. यानंतर काँग्रेसने आशिष देशमुख यांना नोटीस बजावली. आता आशिष देशमुख भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे नाश्ता केला. त्यांच्यात अर्धा तास चर्चाही झाली. त्यामुळे आशिष देशमुख भाजपमध्ये येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान,  आशिष देशमुख यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र, बाजार समितीच्या निवडणुकानंतर भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे भाजपमध्ये कोण येणार? कोणत्या पक्षातून येणार? हे बावनकुळे यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.