‘मिलिंद (चपरासी) नार्वेकर हिम्मत असेल तर कधी निवडणुकीत उभा राहून दाखव’

मुंबई : किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या वादात आता नारायण राणे यांनी देखील उडी घेतली आहे. चुकीच्या कामामुळे घाबरून त्यांना आता घाम फुटला होता, खंर तर हे सांगण्यासाठी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत नारायण राणे यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पहाणं आता महत्वाचे ठरेल.

नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.

नारायण राणे यांच्या टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?’ असा घणाघात मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.

त्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर खरपूस टीका केली आहे. ‘स्व. बाळासाहेबांनी विनायक राऊत व मिलिंद नार्वेकरला काडीची किंमत दिली नाही, साधं राज्यमंत्री सुद्धा केलं नाही. उद्धव ठाकरेकडे चाटूगिरी करून सुद्धा उद्धव ठाकरेनी पण या दोघांना राज्यमंत्री केलं नाही. मिलिंद (चपरासी) नार्वेकर हिम्मत असेल तर कधी निवडणुकी मध्ये उभा राहून दाखव.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.