‘महाराष्ट्रात जिथं-जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं-तिथं दुग्धाभिषेक घालणार’

मुंबई : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आहे.

शिवप्रेमींनी कानडी व्यवसायिकांना दुकान बंद करायला भाग पाडले आहे. कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. शिवप्रेमी कडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

आता उद्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या संतापजनक घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात जिथे-जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत तिथे-तिथे महाराजांच्या पुतळ्यांना दुधाचा अभिषेक घालणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे.

‘कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उद्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील’. अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.