‘रामदासभाई माझे नेते…’ वाचा रामदास कदम यांच्याबद्दल काय म्हणाले अनिल परब !

मुंबई : माझी बाजू महाराष्ट्राच्या शिवसैनिकांसमोर यावी, मला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ते किती चुकीचं आहे, मला राजकीय दृष्ट्या उद्धवस्त करणारं हे सांगण्यासाठी माझी बाजू मांडणार आहे. जी तथाकित ऑडिओ क्लिप आली त्यात मी शिवसेना, शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल काही बोललेलो नाही. मी पक्षाला हानी होईल असं मी काहीही बोललो नाही. शिवसेना पक्ष प्रमुखांना जे पत्र दिलं होत त्याची प्रत मी आपल्यासमोर देत आहे. दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून काही मत मांडली होती. मी शिवसेना प्रमुखांसमोर मी मतं मांडली आहेत. असा खुलासा शिवसेनेचे बडे नेते रामदास कदम यांनी नुकेतच पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडलाय. तालुकाप्रमुखांची नावं माहिती नाहीत. अनिल परब यांच्या हॉटेल यांच्या विरोधात बोलणं मी पक्षाविरोधात बोलणं आहे का?, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत होता तो त्यांनी पाडला. वैयक्तिक संपत्ती पाडली तरी पक्षाविरोधात कसा काय, असा सवाल रामदास कदम यांनी केला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर उठलेल्या या अनिल परबला शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालायची असल्याचा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे.

रामदास कदम यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनी जास्त बोलणे टाळले आहे. रामदास कदम माझे नेते आहेत. मी शिवसैनिक आहे. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. अस म्हणत अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर अधिक बोलणे टाळले आहे.