ही मोठी शोकांतिका… आमदार गोपीचंद पडळकरांचं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबई – भाजपचे आमदार आणि आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) स्थापन झाल्यापासून माध्यमांतून दूर आहेत. मात्र आता पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून अण्णाभाऊ साठेंच्या नावाने भायखळा येथे असलेल्या सभागृहाची शोकांतिका मांडली आहे.

ते म्हणाले, बहुजनांच्या वेदनेचा आवाज म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. परंतु गेल्या तब्बल ३८ वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या भायखळा, मुंबई येथील नाट्यगृह मात्र बंद पडले आहे. त्या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा अपमानच होतोय.

२०१४ ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यक्षम युती सरकारने प्रस्ताव तयार केला. त्यानंतर सभागृह उभं राहिलं. परंतु आघाडी सरकारने ते काम रखडत ठेवलं होतं. आता बहुजन हिताचा विचार करणारे कार्यक्षम सरकार सत्तेवर आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु मुंबई येथील सभागृह उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेले आहे ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं नाट्यगृह प्रेक्षकांसाठी सुरू करावे. हाच खरा लोकशाहीर अण्णाभाऊचा गौरव असेल! असं त्यांनी म्हटलं आहे.