भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी मुंबई – भाजपचे आमदार गणेश नाईक (Ganesh naik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात आता भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात याआधीच मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live in a relationship) संबंध असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने केला होता.

शनिवारी गणेश नाईक यांच्याविरोधात 2010 ते 2017 दरम्यान पीडितेवर शारीरिक आणि मानसिक शोषण करत (Physical and mental abuse) असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, 2021 मध्ये गणेश नाईक यांनी सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी त्यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार या महिलेने दिली आहे. या महिलेने नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.