Mahavitaran : मीटर रीडर व वीजग्राहकामध्ये वीज बिल कमी करण्यासाठी संगनमत; गुन्हा दाखल

Pune Crime News : वीजबिल (electricity bill) कमी करण्यासाठी वीजमीटर परस्पर काढून ठेवण्याचा व दरमहा मीटरच्या रीडिंगचा फोटो अस्पष्ट ठेवण्याच्या क्ल्युप्तीचा महावितरणकडून पर्दाफाश करण्यात आला. मुळशी तालुक्यातील नांदे येथील घरगुती ग्राहकाकडे हा प्रकार उघडकीस आला असून एजंसीचा मीटर रीडर व संबंधित ग्राहकाविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कोणतीही व्यक्ती पैशाच्या मोबदल्यात वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्यास वीजग्राहकांनी बळी पडू नये. पुणे परिमंडलामध्ये अशा संशय़ास्पद वीजवापराची तपासणी युद्धपातळीवर सुरु आहे. वीज वापर कमी दाखवणे, परस्पर मीटर काढून गहाळ करणे असा प्रकार झाला असल्यास संबंधित वीजग्राहकांनी संबंधित कार्यालयामध्ये त्वरित कळवावे किंवा तक्रार करावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडून वीज मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी एजंसीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजंसीच्या कर्मचाऱ्यांकडून मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा, मीटर सुस्थितीत असूनही नादुरूस्त असल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्यास त्याची स्थानिक कार्यालयांकडून खातरजमा करण्यात येत आहे. तसेच एजंसीच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महावितरणकडून देखील दोन टक्के प्रमाणात रीडिंग घेण्यात येत आहे.

या पर्यवेक्षणामध्ये मुळशी विभाग अंतर्गत नांदे येथील एका घरगुती ग्राहकाकडील वीज वापर संशयास्पद असल्याचे दिसून आले. यात मीटर रीडरचा सहभाग असल्याचा संशय बळावल्याने मुख्य अभियंता   राजेंद्र पवार (Chief Engineer Rajendra Pawar) यांनी गंभीर दखल घेतली व तपासणीचे निर्देश दिले. त्यानुसार पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता  माणिक राठोड यांनी चौकशी सुरू केली.

यामध्ये मुळशीचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले, सहायक अभियंता ज्ञानेश्वर डंपलवार, कनिष्ठ अभियंता मनोज काळे, तंत्रज्ञ विशाल धनवट, राहुल रौंधळ यांनी नांदे (ता. मुळशी) येथील घरगुती वीजग्राहक संभाजी सखाराम जाधव यांच्याकडील वीजजोडणीची पाहणी केली. यात मीटर जागेवर दिसून आला नाही. त्यानंतर या ग्राहकाच्या मार्च २०२२ पासूनच्या वीजबिलांची तपासणी केली असता त्यात मोठी तफावत आढळून आली. वीजमीटर परस्पर काढून ठेवणे, रीडिंग घेताना मीटरचा फोटो अस्पष्ट असणे व प्रत्यक्ष रीडिंगऐवजी केवळ १० ते ३० युनिटची नोंद करणे असे प्रकार हेतुपुरस्सर होत असल्याचे महावितरणच्या पथकाला निर्दशनास आले.

त्यानंतरच्या अधिक चौकशीत परस्पर काढून ठेवलेला वीजमीटर हस्तगत व जप्त करण्यात आला. तसेच मीटर रीडिंग घेणाऱ्या अलमदाद कम्प्युटर एजंसीचा कर्मचारी शैलेश शिवाजी तापकिर याने गेल्या मार्च २०२२ पासून मीटर रीडिंग हेतुपुरस्सर अस्पष्ट घेऊन कमी युनिटची नोंद केल्याचे दिसून आले. यासाठी तापकिर याच्याकडून वीजग्राहकाकडे १० ते १५ हजारांची मागणी करण्यात आली. वीजमीटरचे स्पष्ट फोटो व प्रत्यक्ष रीडिंग हेतुपुरस्सर घेतले नाही त्यामुळे महावितरणचे १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३८ नुसार शैलेश शिवाजी तापकिर व संभाजी सखाराम जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा