सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटातील महिला आमदाराची आमदारकी धोक्यात!

जळगाव- जात प्रमाणपत्र प्रकरणी जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे शिंदे गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे पद धोक्यात आले आहे. ही माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिली. (mla lata sonawane news update)

सोनवणे यांनी २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. चोपडा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या आरक्षीत जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या. तथापि, त्यांच्या विरूद्ध पराजीत झालेले उमेदवार जगदीश वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. यातून जात पडताळणी समितीने लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता.

या निर्णयाच्या विरोधात लताताईंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. पुढे शुक्रवारी (९ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या.के.एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.