लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी मुंबईकडे रवाना

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena, Bharatiya Janata Party, Congress and NCP) असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

दरम्यान, आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच  राज्यसभेला भाजपने महाविकास आघाडीला (MVA) पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मविआला आम्ही चितपट करू असा चंग देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बांधला आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या सामन्यासाठी विशेष तयारीनिशी सज्ज झाली आहे.

दरम्यान,अशातच भाजपाचे आजारी असलेले पुणे, पिंपरी चिंचवडमधील दोन आमदार मुंबईकडे निघाले आहेत. मुक्ता टिळक (Mukta Tilak) या सकाळीच मुंबईकडे रवाना झाल्या. तर लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे अँम्बुलन्समधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना लढवय्ये आमदार म्हणत त्यांना हा विजय समर्पित केला होता.