विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाला; राष्ट्रवादीचे रडगाणे सुरूच 

मुंबई   – अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यसरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्रसरकारने कायदा करुन ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पध्दतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्रसरकारकडे करु असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.