…अश्या नालायकांना दिसताक्षणी गोळ्या घातल्या पाहिजेत; वसंत मोरेंची मागणी

Pune – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची (Kolhapur ) हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील तणावाची परिस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी केलं आहे. जिल्ह्यात येत्या 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत.

एका बाजूला प्रशासन शांतता राखण्याचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप काही थांबत नसल्याचे चित्र आहे. यातच आता पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी एक लक्ष्यवेधी फेसबुक पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, कधी कधी समाजात घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे मन इतके विचलित होते की काहीच सुधरत नाही कोणतरी नालायक समाजकंटक कसली तरी पोस्ट टाकतो काहीतरी स्टेटस ठेवतो जे त्याने ठरवलेलेच असते आणि मग कोणतरी हालक्या कानाचा सडक्या मेंदूचा त्या पोस्ट व्हायरल करतो आणि मग एका पोस्ट वरून त्या त्या धर्माचे ठेकेदार डोकी फोडायला बाहेर पडतात.

 

आजकाल झालाय काय तेच समजत नाही. नक्की चुकतोय कोण तेच कळेना कायद्याच्या रक्षकांचे हात बांधून त्यांनाच जबाबदार धरले जाते. मा. राजसाहेब म्हणतात त्याप्रमाणे एकदातरी पोलिसांना मोकळीक दिलीच पाहिजे मग पहा तो समाजकंटक कोणत्याही जातीचा धर्माचा असो कसा बिळात जातो ते समाज कंटकाला कोणतीही जात धर्म नसतो अश्या नालायकांना दिसताक्षणी गोळ्या घातल्या पाहिजेत तरच ही अशांतता शांत होईल . असं मोरे यांनी म्हटले आहे.