‘कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचं काम आहे, मात्र सरकार दंगली पेटवण्याचं काम करत आहे’

अमरावती  –   जातीय- धार्मिक ध्रुवीकरणासाठी देशभर प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. खासकरून सधन – औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागांमध्ये अशांतता निर्माण केली की मोठ्या प्रमाणावर मजूर-कर्मचारी रस्त्यावर येतात आणि अशा लोकांना दंगली घडवण्यासाठी वापरता येतं हे भाजपा आणि कट्टरतावादी संघटनांची मोडस् ऑपरेंडी आहे. त्याचमुळे हातावरचं पोट असलेल्या औद्योगिक भागांमध्ये किंवा स्थलांतरित मजूरांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य ही धोक्यात येऊ घातलं आहे.असं  माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या,  महाराष्ट्राच्या भूमीतून अनेक संत निर्माण झाले. ज्यांनी जात-धर्म-अध्यात्म यांचं सुरेख आणि विवेकवादी विवेचन केले आहे. या संतपरंपरेने धर्मातील अनेक अनिष्ट चाली-रिती बदलल्या, सुधारणा केल्या. खऱ्या अर्थाने ही सुधारणावादी चळवळ आहे. अध्यात्म हा या चळवळीचा आत्मा. महाराष्ट्राच्या जनतेला देव-देश आणि धर्म चांगल्या पद्धतीने समजतो. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले ज्यात सलोखा आवर्जून जपला. राजांनी सर्वांना सोबत घेऊन जनतेचे राज्य स्थापन केले. मात्र सध्या भाजपा ला सत्तेवर येण्यासाठी हा सलोखा संपवायच आहे.

मी ज्या अमरावतीचं प्रतिनिधीत्व करते त्या अमरावतीत उद्योग यावा म्हणून आम्ही दिवसरात्र मेहनत केली. सामान्य लोकांना – बेरोजगारांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून जॉब मेळावे भरवले. मात्र याच अमरावतीला द्वेषाची प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न भाजपा आणि समर्थक लोकप्रतिनिधींनी केला. माझी अमरावतीच्या तसेच राज्यातील सर्व जनतेला विनंती आहे, अशा सापळ्यांमध्ये अडकू नका. हा देश मोदी येण्याआधी ही होता आणि नंतरही राहणार आहे.

हिंदू धर्म संकटात असल्याची भीती दाखवून लोकांना अस्थिर केलं जात आहे. जर सत्तेत आल्यानंतर ९ वर्षांनीही हिंदू धोक्यात असतील तर मग नरेंद्र मोदी फेल आहेत हे भाजपने मान्य करायला पाहिजे. मोदींचं नेतृत्व बदलून देश सुरक्षित करायला पाहिजे. जर कुठेही काही समस्या असेल तर देशाचे पोलीस आणि न्यायव्यवस्था आहेच की, काही गुंडांच्या टोळ्यांना समाजाचा ताबा देण्याची परवानगी देता येणार नाही.

सध्या अनेक भागांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, २०२४ च्या निवडणुका जिंकायच्या असतील तर जातीय-धार्मीक ध्रुवीकरण केल्याशिवाय गत्यंतर नाही याची खात्री भाजपाला आहे, याच मुळे हिंसेचे कारखाने थाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी आपण सर्वांनी आपली बुद्धी शाबूत ठेवा. खोट्या प्रचार आणि अफवांना बळी पडू नका.

कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचं काम आहे, मात्र सरकार दंगली पेटवण्याचं काम करत आहे. सरकारचे प्रवक्ते दररोज राज्यात अस्थिरता निर्माण करत आहेत. अशावेळी महाराष्ट्रासारख्या राज्यातील नागरिकांची जबाबदारी आणखी वाढते. हा विद्वेष संपवायचा असेल तर एक छोटंसं काम आपण सगळे मिळून करू शकतो,  आज  आपण सगळे मिळून छत्रपती शिवरायांची शपथ घेऊया की या महाराष्ट्रात आम्ही असले धंदे चालू देणार नाही. आम्ही महाराष्ट्रातील शांतता भंग होऊ देणार नाही. जातीयवादी-धर्मांध शक्तींना थारा देणार नाही.असं ठाकूर यांनी म्हटले आहे.