भाजपाकडून हिजाबचा वाद विनाकारण; हिजाब नाही मोदींनी हिशोब द्यावा – कॉंग्रेस 

मुंबई –  काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक असून निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस शिष्टमंडळाने आज सायंकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या प्रकृत्तीची विचारपूस केली, मुख्यमंत्र्याची प्रकृत्ती आता चांगली आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पुर्ण केलेली आहेत या दोन वर्षाच्या काळातील कामकाजाबाबत काही सुचना आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केल्या. ग्रामीण भागात महावितरण कडून विजेची कनेक्शन्स कापली जात आहेत. त्याबाबतही चर्चा केली, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाली. खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी आतापपर्यंत लावलेल्या आरोपातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. महाराष्ट्राचा विकास होऊ नये यासाठी भाजप काम करत आहे. सोमय्या पुन्हा कोर्लई गावात जातील आणि पुन्हा तेथील काही लोक त्यांना विरोध करतील, यातून वातावरण अशांत करण्याचा सोमय्या यांचा प्रयत्न आहे.

देशात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था शेतकरी, कामगारांच्या समस्यांसह अनेक महत्वाच्या समस्या असताना भाजपाकडून जाणीवपूर्वक हिजाबचा मुद्दा उपस्थित करुन वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. आता ‘हिजाब’चा नाही देशाला ‘हिशोब’ देण्याची वेळ आहे, तो ‘हिशोब’ द्या, असेही पटोले म्हणाले.