“मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो, माझ्या शरीरात…”, मोदींची विरोधकांवर टीका

PM Modi Telangana: आज देशातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर असून तेलंगणामध्ये बोलताना त्यांनी विरोधकांवर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. तसेच, तेलंगणामधील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतानाच राज्यात लवकर कमळ फुलेल, असंही मोदी म्हणाले.

यावेळी बोलताना मोदींनी उपहासात्मक शब्दांमध्ये विरोधकांना टोला लगावला. “मी आज सकाळी दिल्लीत होतो. नंतर कर्नाटक, तमिळनाडूमध्ये होतो. रात्री आंध्र प्रदेशमध्ये असेन. आत्ता तेलंगणामध्ये आहे. लोक मला विचारतात तुम्ही थकत नाहीत का? मी त्यांना समजावलं की हे बघा.. मी रोज दोन-तीन किलो शिव्या खातो. परमात्म्यानं माझ्यामध्ये अशी रचना केली आहे, की या सगळ्या शिव्या माझ्यामध्ये प्रक्रिया होऊन जीवनसत्वांमध्ये रुपांतरीत होतात. एक सकारात्मक ऊर्जा तयार होते”, असं मोदी म्हणाले.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, मला आणि भाजपला शिव्या दिल्याने तेलंगणाची परिस्थिती आणि लोकांचे जीवन सुधारत असेल तर आम्हाला शिव्या देत राहा, पण माझ्या विरोधकांना ते तेलंगणातील जनतेला शिव्या देत आहेत असे वाटत असेल तर ते सहन केले जाणार नाही.