मोदी यांच्या निष्कलंक नेतृत्वावर न्यायालयापाठोपाठ जनतेचेही शिक्कामोर्तब केले – मुळीक 

Pune – तब्बल वीस वर्षांच्या न्यायालयीन संघर्षास संयमीपणे साजरे जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधातील काँग्रेसच्या जकिया जाफरी (Zakia Jaffrey)  यांची याचिका निकाली काढून सर्वोच्च न्यायालयाने (Supreem Court) पंतप्रधान मोदी यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केल्याने भारतीय जनता पार्टीची (BJP) मान अभिमानाने उंचावली आहे. ही मोदी यांच्यासाठी आणि भाजपसाठी सर्वोच्च समाधानाची बाब असून ताज्या पोटनिवडणूक निकालाने देशातील सर्वसामान्य जनतादेखील मोदी आणि भाजपसोबत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष  जगदिश मुळीक (Jagdish Mulik) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

देशाच्या न्यायव्यवस्थेवर भाजपचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच वीस वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढाईत भाजपने कोठेही शक्तिप्रदर्शन, आंदोलने किंवा टीकाटिपणी करून न्यायप्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना मारला. याउलट, या प्रक्रियेस संयमाने सामोरे जाऊन पंतप्रधान मोदी यांनी न्यायव्यवस्थेच्या सार्वभौमत्वाविषयीचा आदर देशाच्या जनतेमध्ये रुजविला. पंतप्रधानांच्या या संयमी स्वभाव वैशिष्ट्यामुळेच आज संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र असून लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने प्रस्थापित पक्षांचे बुरुज उद्ध्वस्त करून पक्षाचा झेंडा रोवला आहे. जनता मोदी यांच्यासोबत असून ‘सबका साथ सबका विकास’ या पंतप्रधानांच्या ध्येयाच्या वाटचालीत जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे सिद्ध झाले आहे, असे मुळीक म्हणाले.

पोटनिवडणुकांतील या विजयाआधी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील फेरविचार याचिका (Reconsideration petition) सर्वोच्च न्यायालयानेच निकाली काढल्यामुळे भाजपचा विजय अधिक तेजस्वी झाला आहे. सन २००२ मधील गुजरात दंगलप्रकरणी (Gujarat riots case) नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ जणांना निर्दोष ठरविण्याच्या विशष चौकशी पथकाच्या निर्णयास काँग्रेसच्या जकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही विशेष चौकशी पथकाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पंतप्रधानांविरोधातील राजकीय कारस्थानास चपराक बसली आहे, असे ते म्हणाले. गेल्या २० वर्षांत विरोधकांनी मोदी यांच्यावर बेलगाम आरोप करून त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. या  स्वार्थामुळे देशातील विधायक समाजकारणाकडे या पक्षांनी पाठ फिरविल्यामुळेच जनतेने त्यांना निवडणुकीत धडा शिकवून मोदी यांच्या विकासाच्या ध्येयास पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही मुळीक यांनी केली.