चर्चा तर होणारच! जम्मू-काश्मीरचा ‘हा’ अनकॅप्ड अष्टपैलू २.६० कोटींसह सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात

IPL Auction Live: आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या अनुभवी क्रिकेटर्सच्या लिलावानंतर अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव झाला. अनकॅप्ड खेळाडूंच्या लिलावात विवरांत शर्मा या नावाची सर्वाधिक चर्चा झाली. अष्टपैलू विवरांत शर्माला (Vivrant Sharma) विकत घेण्यासाठी सनरायझर्स हैदाराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झुंज पाहायला मिळाली. अखेर या लढतीत हैदराबादचा संघ सरस ठरला. केवळ २० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या विवरांत शर्माला हैदराबाद संघाने २ कोटी ६० लाखांना विकत घेतले. ही बोली नक्कीच विवरांतला अचंबित करणारी ठरली.(Vivrant Sharma sold to SRH for 2.60 crores.).

जम्मू-काश्मीरमधील २३ वर्षांच्या विवरांत शर्माने अलीकडच्या काळात अप्रतिम खेळ दाखवला आहे. त्यामुळे लिलावात त्याच्यावर फ्रँचायझींची नजर असणे साहजिक होते. तसेच गेल्या काही महिन्यातील त्याचा खेळ पाहता लिलावात त्याला ही किंमत मिळणे चुकीचे नाही. टी२० मध्ये त्याने ८ डावात १९१ धावा केल्या आणि ६ विकेट्सही घेतल्या. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर १४ सामन्यात ५१९ धावा आणि ८ विकेट्स आहेत. तो डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.

विवरांतबरोबरच समर्थ व्यास (२० लाख), सनवीर सिंग (२० लाख) यांनाही हैदराबाद संघाने विकत घेतले. तसेच चेन्नई सुपर किंग्जही शेख रशिदला २० लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे गेली काही वर्षे आयपीएलमध्ये खेळलेला अनकॅप्ड खेळाडू प्रियम गर्ग मात्र अनसोल्ड राहिला.