पुण्यात कोणाची ताकद जास्त हे सर्वश्रुत आहे; कॉंग्रेसच्या जोशींनी अजितदादांच्या दाव्यातील काढली हवा

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.मात्र दुसऱ्या बाजूला हि जागा कुणी लढवायची यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे. हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत, असं म्हणतं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा ‘अधिकृतपणे’ दावा सांगितला आहे.

लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नाही, असं वाटतं होतं. पण मला माहिती मिळाली की, पोटनिवडणूक लागणार आहे. यात आता ज्या पक्षाची ताकद असेल त्याला ती जागा मिळावी, असंही अजित पवार म्हणाले. पुण्यात टिंबर मार्केटमधील पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.

दरम्यान, अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्याने कॉंग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.या दरम्यान,  कॉंग्रेस नेते मोहन जोशी यांनी याच मुद्द्यावर भाष्य करत हि जागा कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, पुणे लोकसभेतील सहा विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक आमदार आहेत. कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभेत काँग्रेसचा थोडक्यात पराभव झाला. या उलट पर्वतीमध्ये राष्ट्रवादीचा मोठ्या फरकाने पराभव झाला. मग कोणाची ताकद जास्त हे सर्वश्रुत आहे, असं म्हणत मविआचा वाटपात ही जागा आम्हालाच मिळणार, असा दावा काँग्रेसने केला.

मागील काही वर्षांपासून पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचाच आहे. त्यामुळे हा मतदार संघा कॉंग्रेसकडेच राहिल. या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेत असताना महाविकास आघाडीचे सर्व नेते मुंबईत एकत्र बैठक घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतली. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही आहेत आणि राजकारणही नाही आहेत. त्यामुळे फक्त भाजपचा पराभव करायचा हेच महाविकास अघाडीचं लक्ष्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.