शरद पवारांनी भाकरी फिरवली! सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी गेल्या काही काळापासून भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. आता अखेर प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी ही घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीचा आज २५वा वर्धापन दिन. या निमित्ताने दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.  प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

यानंतर मुलगी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना देखील कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे.  तर सुनील तटकरे यांना राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले आहे.  जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.