मलिकांच्या समर्थनार्थ ‘मविआ’चे आंदोलन सुरू; ठाकरे, राऊत, शिंदे प्रचारासाठी उत्तर प्रदेशात

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. काल आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पक्षाचे प्रमुख नेते दिसून येत आहेत. मात्र, शिवसेनेचे प्रमुख नेते अनुपस्थित (Shiv Sena leaders absent) आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

आज सकाळी आंदोलनस्थळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, रुपाली चाकणकर, अस्लम शेख, तसेच इतरही मंत्री आणि नेते दिसून येत आहेत. मात्र, शिवसेनेचे प्रमुख नेते अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले. शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई, मनीषा कायंदे, सचिन अहिर, यामिनी जाधव, सुनील राऊत हेच नेते  आंदोलनस्थळी पोहोचले.

मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, मंत्री उदय सामंत, मंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेशात प्रचारासाठी निघून गेले आहेत. तर मंत्री अनिल परब हे भराडीदेवीच्या यात्रेसाठी कोकणात गेले असल्याचे समोर आले आहे.