नागपूर जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटची वीज महावितरणने कापली

नागपूर – राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर जिल्ह्यातील, 200 ग्रामपंचायती या गेल्या तीन दिवसांपासून अंधारात गेल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने महावितरणने वीज कापली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावे रात्रीच्या काळोखात गुडुप झाली आहेत.

राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार, ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटच्या बिलाचे अनुदान राज्य सरकार थेट जिल्हा परिषदला देणार आहे. जिल्हा परिषदा ते अनुदान पंचायत समितीमार्फत महावितरणकडे वर्ग करणार आहे. आधी हे अनुदान थेट महावितरणला देण्यात येत होते. त्यामुळे आता महावितरणकडे स्ट्रीट लाईट बिलाचे पैसे जमा न झाल्याने महावितरणने सरसकट जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची वीज कट करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारे ग्रामीण भाग अंधारात गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. तसेच ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती आहे तर ऊर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल असा सवालही विचारण्यात येत आहे.