पक्षाने दिलेला आदेश पाळायचा हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं आहे – मुक्ता टिळक 

Mumbai – विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

दरम्यान, आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रवाना झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणूक (Legislative Council Elections) भाजपचं (BJP) जिंकणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.

आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय. सर्व पक्षांनी आपली ताकद लावली आहे. भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा हे आधीपासूनच आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळण्यासाठी मी जात आहे, असं मुक्ता टिळक म्हणाल्या.