चमत्कारावर विश्वास तर लक्ष्मण जगताप-मुक्ता टिळक यांच्या जीवाशी खेळ का? संजय राऊतांचा सवाल

Mumbai – विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

दरम्यान, आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच राज्यसभेला भाजपने महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मविआला आम्ही चितपट करू असा चंग देवेंद्र फडणवसांनी बांधला आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या सामन्यासाठी विशेष तयारीनिशी सज्ज झाली आहे.

दरम्यान, जिंकणार तर आम्हीच असा दृढ आत्मविश्वास आघाडीला आहे. याचपार्श्वभूमीवर सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. चमत्कारावर विश्वास तर लक्ष्मण जगताप-मुक्ता टिळक यांच्या जीवाशी खेळ का?  असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) सामनातून विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी जिंकण्याचा आत्मविश्वास बोलून दाखवला आहे. राज्यसभेसारखाच विधान परिषद निवडणुकीतही असाच चमत्कार होईल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यावरच सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय.