माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावला; आमचे नेते आजही शरद पवारच – वळसे पाटील

Dilip Valase Patil – आपण शरद पवार (Sharad Pawar) हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असा थेट हल्लाच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी चढवला आहे.

रविवारी पुण्यातील मंचर येथील जाहीर कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडे शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले (राष्ट्रवादीचे) फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

दरम्यान, हि टीका शरद पवार यांच्या गटाला चांगलीच झोंबली आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वळसे-पाटील यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसतो आहे. माझे संपूर्ण भाषण ऐकले तर लक्षात येईल की मी शरद पवारांविषयी असे बोललेलो नाही. माझे असे म्हणणे होते की, 40 ते 50 वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केले. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही, याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवारांच्या पाठीमागे अशी शक्ती उभी केली नाही, असे बोलून शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही त्यांना काही चुकीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शरद पवार हे आमचे कालही नेते होते, आजही आहेत व उद्याही राहतील. ते माझ्यासाठी कायम गुरूस्थानी राहतील. अशी सारवासारव त्यांनी केली आहे.