मुंबईत सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना केल्याचा नाना पटोलेंचा आरोप

मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेवरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. केवळ भाजपच (BJP) नव्हे तर सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने (Congress) नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे.

नाना पटोले यांनी म्हटलं की, तीन पक्षांचं सरकार असताना सर्व पक्षांनी मिळून वॉर्ड रचना करायला हवी. आपण सोबत राहून जर आपल्या मित्रपक्षाचं नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही, त्यामुळं आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही पुण्यासह अनेक ठिकाणी कोर्टात गेलो आहोत. कारण ज्या पद्धतीनं प्रभागरचना झालीय ती चुकीची आहे. आमची मागणी दोनचा प्रभाग करण्याची होती पण तीन सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे.

मुंबई, पुण्यात महाविकास आघाडीतील काही पक्ष आपल्या सोयीनं प्रभाग तयार केले आहेत. आम्ही कोर्टात या बाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या जागांसदर्भात अद्याप कुठलीही बैठक याविषयी झालेली नाही. बैठक होईल तोवर त्या विषयावर बोलणं बरोबर नाही, असंही ते म्हणाले.