मोदी सरकारच्या काळात देश अधोगतीला लागला, पटोलेंचा घणाघात

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बेरोजगारीची प्रचंड वाढली आहे. शेतमालाला भाव नाही, अर्थव्यवस्था उद्धवस्थ झाली आहे. मोदी सरकारच्या काळात देश अधोगतीला लागला आहे असे असताना सरकार मात्र हिंदू- मुस्लीम याच मुद्द्यावर वाद निर्माण करुन मुख्य समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारचे हे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज तयार करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी,भा. ई. नगराळे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी, पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण शिबीरे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाची तयारी, महागाई विरोधातील जनजागरण अभियान याचाही आढावा घेण्यात आला.

पटोले पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कांग्रेसची कामगिरी चांगली झाली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करावी. राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवा. सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचा विचार रुजवण्याचे काम करा असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.